Wednesday, February 11, 2015


सुनिल दवंगे, अहमदनगर- महाराष्ट्रावर गेल्या दोन वर्षांपासून नैसर्गिक संकटांची जणू मालिकाच सुरू झाली आहे. या वर्षी अल्प पावसामुळे खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली. परिणामी राज्यातील २० हजारांहून अधिक गावांची पीक आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आली. खरिपाची पिके, बहुवार्षिक पिके, फळबागा डोळ्यादेखत करपून गेल्याचे दु:ख शेतक-यांच्या वाट्याला आले. या हाद-यातून सावरतो न सावरतो तोच पुन्हा एकदा महाराष्ट्रावर निसर्गाचे आक्रीत ओढवले आहे. गेल्या पंधरवाड्यात महाराष्ट्राच्या सर्व भागात मुसळधार, मध्यम व हलका पाऊस कोसळला आहे. त्यामुळे रबी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, करडई, कांदा, बटाटा व भाजीपाला नष्ट झाला. द्राक्ष, आंबा, डाळिंब, चिकू, संत्री, मोसंबी आदी फळबागांची फळगळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. आंब्याचा मोहोर तुफानी पावसामुळे झडून गेला आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश व कोकणात अवकाळी पावसाने हाहाकार उडवून दिला. कोकणात नारळ व फळबागांचे अतोनात नुकसान झाले. अहमदनगर नासिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष आणि आंबा बरोबर गहु आणि हरब-याच्या शेतीचे मोठ् नुकसान झाले आहे. राज्यात २२ जण ठार झाले आहेत. निसर्गाच्या आक्रीताचा हा तडाखा शेतक-यांसाठी असह्य असा आहे. शेतक-यांनी शेती पिकवताना दु:ख, वेदना व असहाय्यता तरी किती सहन करायची. खरिपाची पिके गेली. आता रबीची पिके तरी पदरात पडतील या आशेवर शेतकरी जगत असताना निसर्गाने जबरदस्त तडाखा देऊन शेतक-यांचा आर्थिक कणाच मोडून टाकला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात महाराष्ट्रावर गारपीट आणि  पावसाने थैमान घालून उभी पिके नष्ट केली होती. या वर्षी पुन्हा निसर्ग शेतक-यांवर कोपला आहे. अवकाळी पावसाचे हे आक्रीत आणखी दोन-तीन दिवस महाराष्ट्राला विळख्यात घेणार असल्याचे पुण्याच्या वेधशाळेने सूचित केले आहे. या अवकाळी पावसाचे कारण देताना वेधशाळेने म्हटले आहे की, उत्तरेकडून दक्षिणेकडे थंड व कोरडे वारे वाहात आहेत. तर पश्चिमेकडील अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वारे वाहात आहेत. या दोन्ही वा-यांचा मिलाफ विशेषत: मध्यभारतात झाल्याने सर्वदूर पाऊस व काही ठिकाणी गारपीट होत आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, पूर्व राजस्थान, पश्चिमोत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. हे कमी म्हणून की काय? बिहारपासून विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन अवकाळी पावसाला पूरक ठरला आहे. उत्तर भारतात तर मेघगर्जनेसह गारपीट होण्याचे संकेत आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्राला विजांचा कडकडाट व पाऊस याचा सामना करावा लागणार आहे. मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील पाण्याअभावी होरपळणा-या द्राक्ष, चिकू, मोसंबी, संत्री, डाळिंब, केळी व आंब्याच्या बागांना शेतक-यांनी घागरीने पाणी घालून जगविले. परंतु अवकाळी पावसाने मात्र शेतक-यांचे श्रम व आशेवर पाणी फेरले आहे. हा पाऊस शेती उत्पादनाच्या मुळावरच उठला आहे. २०१२-१३ या वर्षात दुष्काळाने शेतक-यांचे कंबरडे मोडले होते. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला होता; परंतु हा पाऊस अवेळी पडल्याने खरीप व रबी पिकांची हानी झाली होती. या वर्षी झालेले नुकसान हे शेतकरी पेलू शकत नाहीत. शेतक-यांना या निसर्गाच्या आक्रीतातून दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने व केंद्र सरकारने संयुक्तपणे मदत करण्याची गरज आहे. या वर्षी खरीप व फळबागांची हानी झाली. शेतक-यांना शासनाने तोकडी मदत देऊन रडक्याचे डोळे पुसल्यासारखे केले. परंतु शेतक-यांचे मूळ दुखणे मात्र गेले नाही. महाराष्ट्रावर निसर्ग संकटांची मालिका ही सातत्याने सुरू आहे. यावर शासन, शास्त्रज्ञ व संशोधकांनी काही उपाय योजिले पाहीजे.  
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगांव तालुक्यातील गव्हाच्या शेतीचे मोठे नुकसान            
                                             
हवामानाचा अंदाज सांगणारी यंत्रणा आपल्याकडे आहे. पाऊस, गारपीट, चक्रीवादळाची पूर्वसूचना मिळते परंतु नेमक्या कोणत्या भागात निसर्गाचे संकट कोसळेल हे निश्चितपणे या यंत्रणेलाही उमजत नाही. या संदर्भात मूलभूत संशोधन होण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्याची गरज आहे. आपल्या देशात कृषिविषयक संशोधनावर फारसे लक्ष दिले जात नाही. कृषि विद्यापीठांचे कार्य व जबाबदारी नेमकी काय? हा विषयच संशोधनाचा आहे. महाराष्ट्रात अजूनही ८० टक्के शेती ही पावसावर अवलंबून आहे. हवामानातील बदल व लहरी पावसामुळे कृषि उत्पादनाचे नियोजनच बिघडून जाते. त्याचा विपरीत परिणाम राज्याच्या व देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो हे जेव्हा आपल्या राज्यकत्र्यांना समजेल तेव्हा कृषि  
क्षेत्राचे दुखणे संपेल. मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने सुमारे ५० हजार हेक्टरवरील पिके व फळबागांचे नुकसान झाले आहे.  त्यामुळे  शेतक-यांना हजारो कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. हे नुकसान शेतक-यांना परवडणारे नाही. तेव्हा राज्य सरकारनेच शेतक-यांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेनेचे सरकार आहे. फडणवीस सरकार हे शेठजी-भटजींचे आहे. त्यांना शेतक-यांबद्दल कळवळा नाही अशी टीका होते. तेव्हा राज्य सरकारने संवेदनशील होऊन शेतक-यांना या संकटातून मुक्त करण्यासाठी आर्थिक           मदतीची

तजवीज करणे क्रमप्राप्त आहे. राज्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या रबी पिके व फळबागांचा नेमका आढावा घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी रविवारी दिले आहेत. महसूल व कृषि विभागाने संयुक्तपणे या हानीचे पंचनामे लवकर करून तसा अहवाल शासनाला पाठविला पाहिजे. या नैसर्गिक संकटात राज्यात दोन हजार कोटी रुपयांची पिके व फळबागांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. आपत्तीग्रस्त शेतक-यांना हेक्टर किमान ४० हजार                                                   
रुपये व फळबागा मालकांना हेक्टरी ७० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री फडणवीस भाजपचे असले तरी ते संवेदनशील आहेत. शेतक-यांना मदतीसाठी त्यांची संवेदनशीलता कामी यावी एवढी माफक अपेक्षा आमची आहे. राज्य आणि देशाच्या अर्थकारणाचा कणा असणारे व ५५ टक्के रोजगार देणारे कृषि क्षेत्र आहे. या क्षेत्रावरच नैसर्गिक आक्रीतांचा मारा सुरू असल्याने याचे दूरगामी परिणाम समाजजीवनावर व अर्थव्यवस्थेवर होणार आहेत. राष्ट्राचा पोशिंदा असलेला शेतकरी आज हतबल, असहाय्य झाला आहे. त्यांना तातडीने मदत करणे हे राज्य सरकारचे नैतिक कर्तव्य आहे.

............सुनिल दवंगे. शिर्डी अहमदनगर

No comments:

Post a Comment